दोन हंस आणि बडबडे कासव

एक छानसं तळं होतं. त्या तळ्यात एक कासव राहत होतं. ते खूपच प्रेमळ होतं. समोर जो कोणी येईल, त्याची ते आस्थेने चौकशी करीत असे. त्याच्या गप्पिष्ट स्वभावामळे त्याचे खूप मित्र बनले होते. या कासवाचे असेच दोन खास मित्र होते. ते हंस होते. ते हंस रोज त्या तलावावर येत आणि मग कासवासोबत गप्पा रंगत. एकदा खूप मोठा दुष्काळ पडला. परिसरातील सगळे पशुपक्षी तो दुष्काळी भाग सोडून गेले. तलावातील पाणीही हळूहळू आटू लागले. ते इतके आटले की, त्याचा तळ दिसू लागला. त्यातील मासे तडफडून मरू लागले. त्यांना वाचविणे कठीणच होते. पण, कासवाचे हाल होणार, हे लक्षात आल्यानंतर हंस खूप दु:खी झाले. त्यांना सुचेना की, कासवाला कसे वाचवायचे? ते हंस अतिशय दु:खी अंत:करणाने कासवाशी गप्पा मारतात. बोलता बोलता कासवाबद्दलची चिंता ते व्यक्त करतात. शेवटी कासव हंसाना एक उपाय सुचवतो, ‘ मी एक काठी आणीन. ती मधोमध मी तोंडाने पकडीन. तुम्ही त्या काठीच्या दोन्ही टोकांना चोचीने घट्ट पकडा. उडत - उडत जवळपास कुठे पाण्याने भरलेले तळे आहे का ते पाहू. तसे तळे असेल तर, तेथे आपण उतरू आणि राहू. 

हंसांनाही त्याची ही कल्पना पटते. पण, मनात भीतीही असते. हंस सांगतात, “ ठीक आहे तुझी कल्पना ! आम्ही करू सर्व. पण, तुझ्या बडबडय़ा स्वभावाची भीती वाटते. काही झालं तरी, तोंड उघडायचं नाही . तोंड उघडलंस तर खाली पडून मरशील . ' त्यावर कासव सांगतो , ' नाही , तुम्ही मला घेऊन जात असताना . मी चकार शब्दही काढणार नाही . तोंड बंद ठेवेन . ' ठरल्याप्रमाणे दोन्ही हंस कासवाला काठीच्या साहाय्याने उडत घेऊन जाऊ लागले . तेवढ्यात एका नगरातील लोकांचे या विचित्र पालखीकडे लक्ष गेले . ते आपापसात बडबडू लागले . गोंगाट वाढत गेला . हा गोंगाट ऐकून कासवाने हंसाला ‘ हा आवाज कसला ? ' हे विचारण्यासाठी तोंड उघडले आणि खाली पडून कासव मरण पावले . 

तात्पर्य : मित्राचा योग्य सल्ला न ऐकल्यास प्रसंगी जीवावरही बेतते.

4 Comments

Previous Post Next Post