जगात निरुपयोगी काहीही नाही

प्राचीन काळाची गोष्ट. एका ऋषीच्या आश्रमात शंभर विधार्थी विद्यासंपादन करीत होते. गुरु शिकवीत होते, शिष्य शिकत होते. शिष्यांच अध्ययन संपल्यावर दीक्षांत समारंभात गुरुदक्षिणा द्यावयाची असते. शिष्यांनी गुरुवर्यांना विचारले, ' गुरुवर्य , आपण आम्हाला एवढ ज्ञान दिलत. आम्ही आपणाला गुरुदक्षिणा देऊ इच्छितो ; पण आपण त्यागी आहात, आपणाला आम्ही गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ?  आपण सांगावे.'
'शिष्यवृन्द्हो, मला अशी गुरुदक्षिणा आणा, जी जगात कोण्याच्याही उपयोगाची वस्तू नाही. निरुपयोगी वस्तू हीच माझी गुरुदक्षिणा!'
मग शिष्य निरुपयोगी वस्तू शोधायला निघाले. द्रव्य, वस्त्र, पात्र, धान्य यांपैकी काहीही नको, कारण या सर्वांचा उपयोगच असतो.
एका शिष्याला एका झाडाखाली वाळलेली पाने दिसली. तो म्हणाला 'ही पाने निरुपोयोगी आहेत. तीच आपण गुरुदक्षिणा म्हणून देऊ.'
शिष्य पाने नेऊ लागले तेवढ्यात एक शेतकरी आला. तो म्हणाला, 'कसला नेता ही पानं? ती कुजवून मी खत म्हणून वापरतो. शेताला उपयोगी पडतात.'
शिष्य पुढे गेले. त्यांना काही वाळलेल्या काटक्या दिसल्या. त्यांची मोळी बांधून नेणार एवढ्यात काही स्त्रिया आल्या. म्हणाल्या, 'कशाला नेता ही काष्टे? ती जळणासाठी उपयोगी पडतात. त्यांवर आमचा स्वयंपाक होतो.'
शिष्य पुढे गेले. एकजण म्हणाला, 'आपण मातीच नेऊ या.'
'अरे बाबा, माती तर सर्वात उपयुक्त आहे. मातीतूनच वृक्ष उगवतात.' मग माती आणण्याचा विचार त्यांनी रद्द केला. ते अजून पुढे जात होते. एका लहानश्या ओढ्याकाठी ते आले. त्या ओढ्याच्य प्रवाहात एका पक्ष्याच भलं मोठं पीस वाहत येताना दूरवरून त्यांनी पाहिलं. एक शिष्य म्हणाला, 'हे पिसच आपण देऊया. ते निरुपयोगी आहे. पीस जवळ आल्यावर त्यांनी पाहिलं तर त्या पिसावर काही मुंग्या होत्या. त्या म्हणाल्या, 'आमचं वारूळ फुटलं. आम्हाला पलीकडे जायचं होत. आम्ही सर्वांनी मिळून हे पीस ओढलं आणि त्यावर बसलो. ही पीस आम्हाला उपयुक्त आहे.'
शिष्यांना समजल, कोणतीच वस्तू निरुपयोगी नाही. शिष्य निराश मानाने परतले.
गुरुवर्य म्हणाले, 'जगात कोणतीच वस्तू निरुपयोगी नाही, हे ज्ञान तुम्हाला झालं, हीच माझी गुरुदक्षिणा! जगाच्या उपयोगी पडा!'
तात्पर्य: ज्ञानाची उपयुक्तता प्रत्यक्ष कृतीत दिसली पाहिजे.

No comments:

Post a Comment

@templatesyard