कृती महत्वाची

स्वामीजींच्या प्रवचनासाठी गावोगावहून लोक आले होते. स्वामीजी आपल्या श्रोत्यांना उत्तम उपदेश करत. या उपदेश सभेला ‘सत्संग‘ म्हणत. एकदा स्वामीजींना काही लोकांनी सत्संगासाठी निमंत्रित केल होत. दिवस थंडीचे होते. येणारे लोक शाली, स्वेटर घालून तसेच मफलर बांधून आले होते. त्यात काही काही उच्चभ्रू श्रीमंतही होते. मात्र, स्वामीजींचा वेश साधाच. अंगावर घाबळी पांघरलेली.
एका मोठया प्रशस्त दिवाणखान्यात सभा सुरू झाली आधी एक भजन सुरू होते. मग स्वामीजींचा उपदेश. तेवढ्यात एक याचक त्या दिवाणखान्याच्या दाराशी आला. उघडाबंब थंडीने कुडकुडत, हातात कटोरा घेऊन उभा होता. दिनवाण्या मुद्रेने त्याने आत पाहिल. भजन सुरूच होत. स्वामीजी उठून त्या याचकाकडे गेले. आपल्या अंगावरची घाबळी त्याच्या अंगावर पांघरली आणि शिष्याला खूण केली. शिष्याने काही नाणी त्याच्या कटो-यात टाकली आणि मग तो गरीब याचक निघून गेला. हे सर्व दृष्य सर्वच लोक बघत होते. भजन संपलं.
सत्संग सूत्रसंचालक म्हणाला, ‘आता स्वामीजी आपल्याला उपदेश करतील. आपले कान त्यासाठी आतुरले आहेत‘. पण स्वामीजी काही बोलेनात. बराच वेळ झाला तरी ते स्वस्थच बसून होते. श्रोत्यांमध्ये चुळबूळ सुरु झाली. अखेर सूत्रसंचालक म्हणाला, ‘स्वामीजी, आपण आम्हाला उपदेश देताय ना?‘
‘मी उपदेश दिला आहे,‘ स्वामीजी खणखणीत आवाजात म्हणाले.
’आपण काहीच बोलला नाहीत,‘ सुत्रसंचालक म्हणाला.
‘अस्स! म्हणजे तुम्हाला फक्त शब्दांचा उपदेश हवा आहे; कृती नको. त्या थंडीत कुडकुडणा-या माणसाची अवस्था तुमच्या ध्यानी नाही आली? मी केलेली कृती हाच माझा उपदेश!
सर्व श्रोते थक्क झाले.
तात्पर्यः केवळ कोरड्या शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते.
Previous Post Next Post