आज वामनराव वॉकिंग करून घरी परत येत असताना वाटेत रमेशशी त्यांची भेट झाली. वामनराव दिसताच रमेशने आपली लूना बाजूला लावली आणि जवळ येऊन वामनरावना वाकून नमस्कार केला, रमेश हा ५ वर्षापूर्वी त्यांच्या ऑफिसमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होता. वामनराव सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अधिकारी होते. तीन वर्षाआधी ते निवृत्त झाले होते. त्यांनी रमेशच्या खांद्यावर हात ठेवत म्हटले, "काय रमेश कसा आहेस?, बाकी घरचे सर्व कसे आहेत? आणि इकडे कुठे निघालास?" त्यावर तो म्हणाला, "साहेब सर्व ठीक चालले आहे. आम्ही अगदी आनंदात आहोत, सहा महिन्यांपूर्वी मी पण निवृत्त झालो." "अरे वा... रिटायर्ड लाईफ एंजॉय करत आहात तर मग." वामनराव हसत म्हणाले. रमेशनी हसत मान डोलावली. "इकडे कुठं निघाला आहात?" यावर रमेश म्हणाला, "साहेब मुलाला रेल्वे स्टेशन ला सोडून आलोय, येताना तुम्ही दिसले म्हणून थांबलो." "छान केलंय, काय करतो मुलगा तुमचा?" त्यावर रमेश म्हणाला, "साहेब तो आयएएस अधिकारी बनलाय. नुकतंच हिंगोलीला पोस्टिंग झाली त्याची." हे ऐकताच वामनरावांना धक्काच बसला, ते अवाक होऊन त्यांचेकडे पाहतच राहिले आणि म्हणाले "काय.... तुमचा मुलगा आयएएस झालाय....?" "हो साहेब." रमेश म्हणाला. आपल्या हाताखालील शिपायाची नोकरी करणाऱ्याचा मुलगा आयएएस झालाय हे ऐकूनच ते अस्वस्थ झाले. त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी आघात झाल्याचे त्यांना जाणवले. स्वतःला सावरत ते म्हणाले, "अभिनंदन रमेशराव आणि तुमची मुलगी....?" "तिचे पण लग्न झाले साहेब. दोघेही डॉक्टर आहेत मुंबईला, स्वतःचे हॉस्पिटल आहे त्यांचे" रमेश म्हणाला. हे ऐकून वामनरावना दुसरा धक्का बसला स्वतःला सावरतच ते म्हणाले, "तुमचे पुन्हा अभिनंदन रमेशराव खूप हुशार होती तुमची मुले आणि तुम्ही कमी पगारामध्ये छान घडवले त्यांना. पण तुम्ही अजुन पर्यंत तुमचे वाहन नाही बदलविले म्हणजे १५ वर्षांपासून तुम्ही तीच लुना वापरताय. छान एखादी बाईक वगेरे घ्यायला पाहिजे होती तुम्ही." त्यावर रमेश म्हणाला, "साहेब आता आपल्याला काम तरी काय आहे हो गाडीचे जास्तीत जास्त मार्केट मध्ये जावं लागतं... ही सर्व कामे मी पायीच करतो म्हणजे शरीराला पण व्यायाम मिळतो आणि तब्येत पण चांगली राहते." आणि इकडचं तिकडचं बोलून रमेशनी वामनरावांचा निरोप घेतला. वामनरावनी आपला रस्ता पकडला. ते घराच्या दिशेने चालू लागले. रमेशला भेटून त्यांना अस्वस्थ वाटू लागले. आपल्या हाताखालच्या एका शिपायाची मुले इतकी पुढे गेली, ही गोष्ट त्यांना खटकुन गेली. शिपायाला पगारच काय असतो. जेमतेम कुटुंब चालवू शकेल इतका. त्यामध्ये रमेशने मुलांना छान शिक्षण दिले, संस्कार दिले. आज त्याचा मुलगा आयएएस बनला आणि मुलगी डॉक्टर. वामनरावांना रमेशचा हेवा वाटू लागला. त्यांच्या डोक्यात विचारांनी गर्दी केली. आपण अख्खं आयुष्य पैश्याच्या मागे धावलो, शासनाकडून चांगला पगार मिळत असतानाही आपण अधिक पैशाची हाव केली, चुकीच्या मार्गाने अमाप संपत्ती जमवली. परंतु तरीही जे समाधान रमेशच्या आयुष्यात आहे, ते समाधान, तो आनंद आपल्या नशिबी नाही. त्यांच्या गतकाळातील आठवणी ताज्या झाल्या, त्यांचा मुलगा जेमतेम १० वी पर्यंत कसातरी गेलेला. स्वतःची पत वापरून त्यांनी त्याला १० वी मध्ये उत्तीर्ण केले, परंतु वाईट संगतीला लागून तो व्यसनाच्या आहारी गेला होता, गुंड प्रवृत्तीचा बनला होता. रोज दारू पिऊन घरी यायचा आणि तमाशे करायचा. त्याची दारू सोडण्याचे बरेच प्रयत्न अयशस्वी ठरले होते. घरात रोज भांडणे होऊ लागली होती, अशातच त्यांची मुलगी कुण्या टपोरी मुलासोबत पळून गेली होती. हा धक्का त्यांच्या पत्नीला सहन झाला नाही. त्यामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन ती सुध्दा त्यांना सोडुन कायमची निघून गेली होती. या घटनेला ३ वर्ष झाली, तेव्हापासून ते एकाकी जीवन जगत होते. त्यांचेकडे भरपूर पैसा होता, परंतु तो पैसा त्यांच्या मुलांना संस्कार देऊ शकला नाही, अमाप पैसा होता परंतू पत्नीला ते वाचवू शकले नाही... खुनाच्या आरोपात मुलगा सध्या जेलमध्ये आहे.... आणि ते सध्या एकाकी जीवनाच्या असह्य वेदना सहन करून एक एक दिवस कसातरी कंठत आहे. नकळत त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले....
मित्रांनो चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा तुम्हाला गाडी, बंगला सर्व भौतिक सुविधा देऊ शकतो परंतु आत्मिक समाधान नाही, सुख शांती नाही.
तो पैसा तुम्हाला मुलायम मखमली बिछाना देऊ शकतो पण सुखाची शांत झोप नाही.