दुसऱ्यांचे उपकार विसरू नका

इसापनीतीतील एक छान गोष्ट आहे. एकदा एका जंगलामध्ये एक लांडगा राहत होता. तो अत्यंत खादाड आणि दुष्ट होता. त्याला एकदा खूप जोर्‍याची भूक लागली, त्याने जंगलातले अनेक प्राणी मारून खाल्ले. पण इथेच तो अडकला. एका प्राण्याला मारल्यानंतर त्याला खाताना त्याच्या घशात त्या प्राण्याचे हाड अडकले.

त्याने ते हाड काढायचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याला यश मिळाले नाही. त्याच्या त्या प्रयत्नांनंतर त्याला खूप त्रास सुरू झाला. त्याला नेमके काय करावे हेच समजत नव्हते. त्याने सुरुवातीला भुरपुर पाणी पिले, परंतु त्याला यश मिळाले नाही. मग त्याने आपल्या इतर मित्रांना आपल्या घशातले हाड काढण्यास सांगितले. परंतु त्याच्या साऱ्या मित्रांनी त्याच्याकडे पाठ फिरवली.

शेवटी त्याला त्याच्या डोक्यावरून एक बगळा उडत जाताना दिसला. त्याने त्या बगळ्याला आपली व्यथा सांगितली. तो म्हणाला बगळ्या तू तुझ्या त्या लांब चोचीने जर माझ्या घशात अडकलेले हे हाड काढलेस तर मी तुला बक्षीस देईन, तुझे ते उपकार मी कधीही विसरणार नाही.

बगळ्याला त्याची दया आली. त्याने लांडग्याला मदत करण्याचे ठरवले. तो त्या लांडग्या जवळ आला आणि त्याने त्या लांडग्याच्या घशात आपली चोच घालून आपल्या चोचीने ते अडकलेले हाड काढले. यानंतर त्या बगळ्याने त्याला आपले बक्षीस मागितले, परंतु त्या धूर्त लांडग्याने त्या बगळ्याला चकमा देत तो तेथून फरार झाला.

यानंतर काही दिवसांनंतर पुन्हा एकदा त्या लांडग्याच्या घशात हाडाचा एक तुकडा अडकला, त्याला पुन्हा बगळा दिसला, परंतु बगळ्याने यावेळेस त्याला मुळीच मदत केली नाही कारण यापूर्वी त्याच्यावर केलेल्या उपकारांना तो लांडगा विसरला होता. म्हणून लक्षात ठेवा कधीही दुसऱ्यांनी केलेल्या उपकारांना विसरू नका.

No comments:

Post a Comment

@templatesyard